About Founder

15 Jul 2023 11:40:54

महर्षी कर्वे – ज्यांना प्रेमाने ‘अण्णा’ असे संबोधले जाते – यांचा जन्म महाराष्ट्रातील कोकण भागात दि. १८ एप्रिल १८५८ या दिवशी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी त्यांचे बालपण मोठ्या कष्टात आणि गरिबीत व्यतीत झाले. बालविवाहासारख्या क्रूर प्रथेचे दुष्परिणाम त्यांनी स्वत: पाहिले होते. स्वत:च्या प्रथम पत्नीचे अकाली देहावसान झाल्यानंतर त्यांनी विचारपूर्वक विधवा मुलीशी पुनर्विवाह केला आणि याद्वारे समाजसुधारणेचे एक उदाहरण समाजासमोर ठेवले. अर्थात यामुळे तत्कालीन समाजाचा फार मोठा रोष त्यांनी ओढवून घेतला पण तरीही ते आपल्या निश्चयावर ठामच राहिले.


महर्षी कर्व्यांनी स्त्री-शिक्षणाचे महत्व ओळखले व तेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून त्याकरिता स्वत:स समर्पित केले. तत्कालीन सामाजिक दृष्टिकोन आणि जुन्या रूढींच्या विरोधात उभे राहणे अत्यंत आव्हानात्मक होते. प्रदीर्घ कालावधीनंतर हळूहळू स्त्री-शिक्षणाबाबत अपेक्षित जागृती होऊ लागली. आज सर्वांगांनी विकसित झालेली ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ हे त्यांच्याच कठोर परिश्रमांचे व दूरदृष्टीचे फळ आहे.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे

सन १८९६ साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी “अनाथ बालिकाश्रम “ ची स्थापना केली. तीच आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. केवळ चार विद्यार्थिनीनसह सुरु केलेल्या संस्थेचे कार्य गेल्या १२९ वर्षात एखाद्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारले आहे.

आजच्या काळातही मुली शिक्षणापासून वंचित राहतात असे दिसते. संस्था अशा सर्व मुलींच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. त्यांच्या शिक्षणाची व वसतिगृहात राहण्याच्या खर्चाची देणगीच्या माध्यमातून सोय करते.

अनेक गरजू व होतकरू मुली आज संस्थेच्या आर्थिक व शैक्षणिक पाठबळामुळे यशस्वी व स्वयंपूर्ण जीवन जगत आहेत.

“महर्षी अण्णांच्या कार्याचा वारसा पुढे चालवू या”

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे स्त्री शिक्षणाच्या कार्यासाठीच समर्पित केले. फार अनुकूल नसलेल्या परिस्थितीतही त्यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला. त्यांनी समाजातील विधवा, अनाथ मुलींच्या शिक्षणाचे शिवधनुष्य लिलया पेलले. त्यांनी “अनाथ बालीकाश्रामाची” स्थापना करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

त्या काळात व आजही संस्थेत शिक्षणासाठी येणाऱ्या मुली व सामान्यतः गरजू, अनाथ, गरीब अशाच असायच्या. त्या सर्वांच्या राहण्याचा, जेवणाचा, शिक्षणाचा खर्च महर्षी अण्णा स्वतः निधी जमवून करत असत. हा निधी याच कार्यासाठी वापरला जात असे व आजही ती परंपरा कायम आहे.

संस्थेच्या पायाभरणीच्या काळात हितचिंतकांचा स्वयंसेवकांचा पाठींबा हा होताच तरी पैशांची कमतरता तर असायचीच. या सर्वांचा विचार करून सन १९१८ साली संस्थेचे आजन्म सेवक गो.म. तथा बापूसाहेब चिपळूणकर यांनी “भाऊबीज निधी” ही अभिनव संकल्पना मांडली. या संकल्पनेला पुढील वर्षी १०६ वर्ष होतील.

या महत कार्यामध्ये समाजातील लहानात लहान व मोठ्यात मोठ्या घटकाचाही त्यांनी समावेश करून घेतला.

मिळणारी भाऊबीज १ रु. आहे की १०० रु. याचा त्यांनी कधी विचार केला नाही कारण ते एक सत्पात्री दान होते. कृतज्ञ व कृतकृत्य भावनेने केलेले ते सत्कार्य होते. गुणवत्ता असलेल्या व शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कोणाही मुलीचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये हे महर्षी अण्णांचे तत्त्व होते. आजही संस्था ते तत्त्व पाळत आहे.

Powered By Sangraha 9.0